बंगळुरू – माजी पंतप्रधान एच. डी. देवैगोडा यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. संसदेतील 19 राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली होती पण त्याविषयी धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या निर्णयाबाबत मात्र काहीच कळाले नव्हते.
तथापि, देवेगौडा यांनी ट्विटरवर आपणही शेतकऱ्यांबरोबरच आहोत, असे नमूद करीत आपणही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणार आहोत असे त्यांनी घोषित केले.
शेतकऱ्यांनी ज्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू केले आहे त्याला आपला पूर्ण पाठिंबा असून आपल्या पक्षाशी चर्चा करूनच आपण हा बहिष्काराचा निर्णय घेत आहोत असे देवेगौडा यांनी नमूद केले. शेतकरी आंदोलन हा विषय आता संसदेच्या चालू अधिवेशनात अधिक वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी बहुतांशी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.