जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वनाथ यांचा राजीनामा

कर्नाटकमधील सत्तारूढ आघाडीला केले टीकेचे लक्ष्य

बंगळूर -कर्नाटकमधील सत्तारूढ आघाडीचा घटक असणाऱ्या जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष ए.एच.विश्‍वनाथ यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये सत्तारूढ जेडीएस-कॉंग्रेस आघाडीला बसलेल्या हादऱ्याने पहिला राजकीय बळी घेतल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पद सोडताना विश्‍वनाथ यांनी आघाडीवर टीकेची झोड उठवली.

कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. त्यातील 25 जागा जिंकत भाजपने जोरदार मुसंडी घेतली. तर कॉंग्रेस आणि जेडीएस या मित्रपक्षांना प्रत्येकी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आधीच अंतर्गत बंडाळीने घेरलेल्या आघाडीतील अस्वस्थता आणखीच वाढीस लागली. अशातच जेडीएसच्या पीछेहाटीची नैतिक जबाबदारी स्वीकारत विश्‍वनाथ यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले. पक्षात दुर्लक्षिले जात असल्याबद्दल आणि महत्वाच्या मुद्‌द्‌यांवर विश्‍वासात घेतले जात नसल्याबद्दल ते नाराज होते. त्यातून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

विश्‍वनाथ आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्यात मागील काही दिवसांपासून जाहीर शाब्दिक युद्ध सुरू आहे. ते पुढे नेत विश्‍वनाथ यांनी पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांना लक्ष्य करत आघाडीच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आघाडी सरकारच्या स्थापनेला एक वर्षाचा कालावधी उलटून गेला. मात्र, अजूनही सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील समन्वय समिती सरकार सुरळित चालण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार करू शकलेली नाही, असे ते राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एच.डी.देवेगौडा यांना कर्नाटकच्या तुमकूरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतवरून पराभूत करण्यासाठी कारस्थान रचण्यात आले, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.