कॉंग्रेसपाठोपाठ जेडीएसकडून 3 अपात्र आमदारांची हकालपट्टी

बंगळूर: कॉंग्रेसपाठोपाठ धर्मनिरपेक्ष जनता दलाने (जेडीएस) कर्नाटकमधील आपल्या 3 अपात्र आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला.
कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या 14 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी काही दिवसांपूर्वी बंड केले.

त्यामुळे त्या पक्षांचे आघाडी सरकार संकटात सापडले. त्यातून त्या सरकारला विधानसभेत शक्तिपरीक्षेला सामोरे जावे लागले. त्यावेळी बंडखोर आमदार विधानसभेत अनुपस्थित राहिल्याने आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यामुळे आघाडी सरकार कोसळून त्या राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले. त्याआधी विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी रमेश कुमार यांनी बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले. त्यासाठी त्यांनी पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींचा आधार घेतला. आता कर्नाटकमधील राजकीय उलथापालथींना कारणीभूत ठरलेल्या आणि बंडखोरी केलेल्या अपात्र आमदारांवर कॉंग्रेस आणि जेडीएसने कारवाईचा बडगा उगारला आहे.

कॉंग्रेसने मंगळवारी 14 अपात्र आमदारांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला. तोच कित्ता माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे अध्यक्ष एच.डी.देवेगौडा यांनी बुधवारी गिरवला. दरम्यान, अपात्र ठरवण्याच्या कारवाईला काही आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायालय काय निर्णय देणार याबाबत उत्सुकता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.