नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्स हे आपल्या कुटुंबीयांसमवेत आज भारत भेटीवर दाखल झाले. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी उषा वान्स आणि पुत्र इवान, विवेक आणि कन्या मारीबेल ही अपत्ये आहेत. अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर वान्स यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. आजपासून २४ एप्रिलपर्यंत ते भारत भेटीवर असणार आहेत. इटलीचा दौरा संपवून ते भारतभेटीवर दाखल झाले आहेत.
पालम विमानतळावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वान्स आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत केले. अमेरिकेच्या उपाध्यक्षांना त्यांच्या आगमनानंतर औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आला. आपल्या भेटीच्या पहिल्या टप्प्यात आज वान्स कुटुंबीयांनी अक्षरधाम मंदिराला भेट दिली. यावेळी वान्स यांच्या मुलांनी चक्क भारतीय पद्धतीची वेशभुषा केली होती. संध्याकाळी वान्स यांनी ७ लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
भारत आणि अमेरिका हे सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी असलेले देश आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या चर्चेमध्ये विविध मुद्दयांचा समावेश असणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. सद्यस्थितीतील ताज्या मुद्दयांवर ही चर्चा होणार असल्याचे उघड आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल यांनी म्हटले आहे.
वान्स कुटुंबाच्या स्वागतासाठी दिल्लीत ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर लावलेले दिसत होते. तसेच वान्स यांच्या वाहनांच्या ताफ्याला रस्ता मोकळा मिळावा, यासाठी वाहतुकीचे नियोजन देखील केले गेले होते. नवी दिल्लीत प्रमुख भारतीय नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर वान्स हे उद्या जयपूरला आणि बुधवारी आग्रा येथेही भेट देणार आहेत. गुरुवारी ते अमेरिकेला परत रवाना होणार आहेत.