Jayashree Jadhav Shivsena | राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठी बळकटी मिळाली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी आपल्या मुलासह आज (३१ ऑक्टोबर) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जयश्री जाधव यांनी आपल्या प्रवेशानंतर शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख तसेच उपनेतेपदी नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या मुलाला सत्यजित जाधव यांना उद्योगविषयक जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कोल्हापूरातील शिवसेनेला बळकटी मिळवून देण्यासाठी जाधव यांचे आगमन विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. | Jayashree Jadhav Shivsena
या पक्षप्रवेशाबाबतची माहिती एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत दिली. “कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज (३१ ऑक्टोबर) आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात सन्मानाने स्वागत करून त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जयश्री जाधव यांचे सुपूत्र सत्यजित जाधव यांनी देखील यासमयी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला,” असे त्यांनी नमूद केले. | Jayashree Jadhav Shivsena |
पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी जयश्री जाधव यांना महिला भगिनींसाठी काम करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले. “विद्यमान आमदार असूनही त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आपल्याला महिला भगिनींसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली, ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या असून या योजना कोल्हापूरातील सर्वसामान्य महिला भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या प्रयत्न करतील असा विश्वास आहे,” असे शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश समारंभाला शिवसेना नेते खासदार नरेश म्हस्के, धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, तसेच मित्रा महामंडळाचे उपाध्यक्ष आणि कोल्हापूर उत्तरचे शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर आदी नेते उपस्थित होते. जयश्री जाधव यांचा पक्षप्रवेश हा शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या विस्तारासाठी मोठा टप्पा ठरू शकतो. | Jayashree Jadhav Shivsena