जयशंकर यांना गुजरातेतून राज्यसभेसाठी उमेदवारी

गांधीनगर – विदेश मंत्री एस. जयशंकर यांना गुजरातमधून भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली असून त्यांनी आज तेथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासाठी ते सोमवारीच अहमदाबादला दाखल झाले. 64 वर्षीय जयशंकर हे मंत्री होण्याच्या आधी भारताचे विदेश सचिव म्हणून कार्यरत होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात त्यांचा विदेश मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाने तेथील आपली दुसरी जागा पक्षाच्या ओबीसी सेलचे नेते जुगबली ठाकोर यांना दिली आहे त्यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही उमेदवारांनी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि भाजप गुजरात प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत आपले अर्ज दाखल केले. अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी राजीनामा दिल्याने या दोन्ही जागा रिक्‍त झाल्या आहेत.

या जागंसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 25 जून अशी आहे. या दोन्ही जांगांसाठीची निवडणूक दोन वेगवेगळ्या दिवशी होत आहे. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे भाजपला या दोन्ही जागा सहज मिळू शकणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.