Jayant Sinha । भाजपने माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत या नोटिशीवर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत. निवडणुकीत मतदानाचा हक्कही बजावला नाही. याशिवाय भाजपने धनबादचे आमदार राज सिन्हा यांनाही नोटीस बजावली आहे. हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून मनीष जैस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही ना निवडणूक प्रचारात रस घेत आहात ना संघटनात्मक कामात, असे का ? असा सवाल पक्षाने जयंत सिन्हा यांना विचारला.
तिकीट न दिल्याने पक्षावर नाराजी Jayant Sinha ।
पक्षाच्या तिकीट न देण्याच्या निर्णयामुळे जयंत सिन्हा नाराज आहेत आणि त्यामुळेच त्यांनी निवडणूक प्रचारापासून दूर राहिल्याचे सांगितले जात आहे. त्यांची ही वृत्ती पाहून आता पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून दोन दिवसांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
मतदानाचा हक्कही बजावला नाही
भाजपने जयंत सिन्हा यांना बजावलेल्या नोटीसमध्ये लिहिले आहे की, “पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून मनीष जयस्वाल यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तेव्हापासून तुम्ही ना निवडणूक प्रचारात रस घेत आहात ना संघटनात्मक कामात. असे असतानाही लोकशाहीच्या या महान उत्सवात मतदानाचा हक्क बजावणेही तुम्ही योग्य मानले नाही. तुमच्या या वृत्तीने पक्षाची प्रतिमा डागाळली आहे.” असा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांच्या सूचनेनंतर जयंत सिन्हा यांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना या नोटीशीवर दोन दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचवेळी भाजपने धनबादचे आमदार राज सिन्हा यांना धनबाद मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाराविरोधात वक्तव्य केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
इंडिया ब्लॉकच्या मंचावर सिन्हांचा मुलगा
अलीकडेच भाजप नेते जयंत सिन्हा यांचा मुलगा आशीर सिन्हा झारखंडमध्ये काँग्रेसच्या (इंडिया ब्लॉक) व्यासपीठावर दिसला. यानंतर बराच गदारोळ झाला. या गदारोळानंतर काँग्रेसनेही याप्रकरणी स्पष्टीकरण दिले होते. झारखंडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर सांगतात की, यशवंत सिन्हा यांना रॅलीचे निमंत्रण देण्यात आले होते, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी त्यांच्या नातवाला प्रतिनिधी म्हणून पाठवले.