मुंबई : राज्य सरकारकडून राज्यात 50 हजार योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे योजनादूत लोकांच्या दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करताना दिसणार आहेत. यासाठी सरकारी तिजोरीतून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट काढायचे आणि त्यातून मलिदा खायची योजना हे सरकार राबवत आहेत. आता अर्थमंत्री म्हणतायेत की, मी आता बघितल्याशिवाय सही करणार नाही. आता त्यांच्या लक्षात आले की, हे कुठेही सह्या घेतात. कोणतेही सरकार आले तरी चालू योजना बंद करणार नाहीत. जाहिरातीसाठी सरकारने 280 कोटी बाजूला काढून ठेवले आहेत. पेपर उघडला की, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दिसतात. कारण त्यांना दोन महिन्यात 280 कोटी रुपये खर्च करायचे आहेत. आता सरकारने योजना दूत नेमले आहेत. सरकारने 300 कोटी रुपये योजना दुतांसाठी राखून ठेवले आहेत. खुर्ची वाचवण्यासाठी हे सरकार काहीही करेल. तुम्ही म्हणा चंद्र पाहिजे ते म्हणतील दोन महिन्यात देतो, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.
काय आहे योजनादूत कार्यक्रम?
राज्यात 50 हजार योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे योजनादुत लोकांच्या दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करताना दिसणार आहेत. योजना दूतांच्या नियुक्त्या सहा महिन्यांसाठी करण्यात येणार आहे. प्रत्येकाला 10 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एका योजनादुताची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येच्या मागे एक योजनादूत अशा प्रकारे 50 हजार योजनादुतांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी 18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.