हे सरकार सामान्यांच्या विरोधातील; जयंत पाटलांचा हल्लाबोल

पाचोरा: फडणवीस सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे कारखाने बंद पडू लागले आहेत. परिणामी युवकांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. शेतकरी, सामान्य माणसांच्या विरोधातील सरकार सत्तेवर आहे. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मोडीत काढणाऱ्या या सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवेल!, असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे आयोजित सभेला जयंत पाटील यांनी संबोधित केले

जयंत पाटील म्हणाले, भडगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निष्क्रियतेमुळे अजूनही शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत तर दुसरीकडे तालुक्यातील अनेक गावांना गारपीटीचा तडाखा बसला. केळीसारखी पिके उद्ध्वस्त झाली. तरी येथील आमदार व सरकारने शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी साधे एक पाऊल टाकले नाही.

महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला तेव्हा आम्ही सरकारला सांगत होतो की, जनावरांच्या छावण्या सुरु करा त्याशिवाय पशुधन वाचणार नाही. परंतु या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना जनावरांना बाजार दाखवावा लागला.

तसेच सांगली-कोल्हापूरमध्ये पूर आल्यावर ५ दिवस उलटले तरी सरकारची मदत पोहचली नव्हती. लोकांनीच लोकांना मदत करत पुरातून बाहेर काढले. मात्र नंतर सरकार टीव्हीवर दाखवू लागले की आम्ही ८०% लोकांना स्थलांतरित केले, असेही पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.