जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध

File photo

राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा; निळवंड्यात कमी पाण्याचा दावा

अकोले – तालुक्‍यातील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असले, तरी तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अशा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये भंडारदरा व निळवंडे धरणामधील पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात येवू नये, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेचे माजी तालुकाध्यक्ष विकास शेटे यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की निळवंडे धरणाच्या लोखंडी दरवाजाच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने निळवंडे धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास जलसंपदा विभागाला अपयश आलेले आहे. त्यामुळे धरणात 75 टक्केच पाणी अडविले गेले. 25 टक्के पाण्यासह जवळपास जायकवाडीसाठी सहा हजार दशलक्ष घनफूट पाणी अगोदरच खाली वाहून गेलेले आहे. धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने उच्चस्तरीय कालव्यातून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्‍यात आला आहे. आधीच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्याचे “लोन’ विर्दभातून अकोले तालुक्‍यात आलेले आहे. विजेच्या लंपडावाने शेतकरी हैराण झालेले आहेत. पूर्णदाबाने व अंखडित वीजपुरवठा होत नाही.

अकोले तालुक्‍यामध्ये या वर्षी कमी पाऊस झाल्याने पेरणी केलेली व लागवडीखालील पिके धोक्‍यात आलेली आहेत. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात असून सरकारने संपूर्ण कर्जमाफी न केल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास उडालेला आहे. यासर्व बाबींनी शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशातच शासनाने निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी चार हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे झाले तर संपूर्ण निळवंडे धरण रिकामे होईल. अकोले तालुक्‍यातील उच्चस्तरीय कालव्यांद्वारे “सुजलाम्‌ सुफलाम्‌’ झालेली शेती उध्दवस्त होईल. निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्यामुळे आजही उच्चस्तरीय कालव्यांच्या लाभक्षेत्रात पाणी मिळालेले नाही. निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला तर तालुक्‍यातील शेतकरी हा पूर्णपणे उद्‌ध्वस्त होईल, असा इशारा त्यांनी दिला.

“धरण उशाला व कोरड घशाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली, तर तालुक्‍यातील शेतकरी शांत बसणार नाहीत. त्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास अकस्मात सामाजिक व सार्वजनिक परिस्थिती धोक्‍याचे वळण घेऊ शकते. निळवंडे धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क अकोल्याचा आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय शासनाने रद्द करावा. अन्यथा, अकोले तालुक्‍यातील शेतकरी मोठया प्रमाणावर जनआंदोलन उभे करतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील अशा इशारा जाधव व शेटे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)