जया तासुंग मोयोंग यांना ‘बाया कर्वे पुरस्कार’

रविवारी वितरण : सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत गौरव


यंदा संस्थेचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष

पुणे – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा “बाया कर्वे पुरस्कार’ यंदा अरुणाचल प्रदेशातील पासीघाट येथील जया तासुंग मोयोंग यांना जाहीर झाला आहे.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी बाया कर्वे पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे वर्ष संस्थेचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी आणि पुरस्काराचे 25 वे वर्षे आहे. यानिमित्ताने संस्थेकडून या वर्षापासून हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणार आहे.

यंदा ज्येष्ठ समाजसेविका अंजली देशपांडे, सीमा कांबळे आणि संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास यांच्या निवड समितीने जया तासुंग मोयोंग यांची निवड केली आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रविवारी (29 नोव्हेंबर) सायंकाळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, संस्थेच्या अध्यक्षा घैसास यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या आवारात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. याचे प्रक्षेपण युट्यूबद्वारे करणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

जया तासुंग मोयोंग यांचे कार्य
वुमन अगेन्स्ट सोशल एविल्स या स्वयंसेवी संस्थेच्या सरचिटणीस असणाऱ्या जया यांनी मादक द्रव्यांच्या वापराविरुद्ध मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे कार्य केले आहे. यामध्ये प्रामुख्याने शालेय मुलांमध्ये अमलीपदार्थांच्या वापराचे निर्मुलन करणे, निरोगी आयुष्य जगण्यासाठी समाज शिक्षीत करणे, अमलीपदार्थांमुळे समाजात निर्माण झालेली गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करणे आदींचा समावेश आहे. संस्थेच्या माध्यमातून अमलीपदार्थाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती आणि पदार्थ सेवनाविरोधात जागरुकतेचे काम केले आहे. यासह त्यांनी महिलांच्या प्रश्‍नांबाबतही कार्य केले आहे. पूर्व सायंग जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. मादक द्रव्याच्या सेवनाविरुद्धच्या कार्याबाबत अरुणाचल प्रदेश सरकारने त्यांना राज्य सुवर्णपदक प्रदान केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.