मुंबई – आयसीसीचे प्रमुख क्रेग बार्कले यांची मुदत संपत असून अध्यक्षपदासाठी बीसीसीआचे अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली इच्छुक आहेत. त्यामुळे येत्या काळात बीसीसीआयच्या होत असलेल्या निवडणुकीत सध्याचे सचिव जय शहा हे बीसीसीआयचे अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या घटनेत दुरुस्ती करण्याची परवानगी दिली असून अध्यक्ष गांगुली व सचिव शहा यांचा कार्यकाळ अजून एक टर्म वाढवून मिळणार आहे. 2019 साली गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष व शहा सचिव बनले होते.
दरम्यान, बार्कले यांचा कार्यकाळ लवकरच संपत असून त्या जागी गांगुली यांना संधी आहे. त्यांनीही या जागेसाठी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. गांगुली जर आयसीसीचे अध्यक्ष बनले तर बीसीसीआयच्या निवडणुकीत शहा हेच अध्यक्षपदावर येतील असे चित्र आहे. त्यांना देशातील तब्बल 15 राज्य संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.
बीसीसीआय लवकरच वार्षिक सर्वसाधारण सभा घेणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य संघटनांमध्ये नव्याने निवडणुका घेण्यासाठी आदेश काढले जाणार आहेत.