सैन्यदलातील जवानाच्या घरालाच लावला टिकाव अन्‌ पहार

प्रशांत जाधव
घराची नासधूस; सातारा तालुक्‍यातील प्रकार

सातारा  – भारतीय सैन्यदलात अहोरात्र मेहनत करून देशरक्षण करणाऱ्या जवानाचे घरच सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. सातारा तालुक्‍यातील धनगरवाडी येथील आप्पासाहेब वाघमोडे यांच्या घराची नासधूस त्याच गावातील काही लोकांनी केली. किरकोळ वादातून संशयितांनी आप्पासाहेबांच्या घरावर टिकाव अन्‌ पहार चालवली. या घटनेत घराचा दरवाजा, भिंत व स्वयंपाकघराचे प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकाराने वाघमोडे कुटुंब भयभीत झाले असून प्रशासकीय यंत्रणांनी त्यांना तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. सातारा जिल्ह्याची उच्च सैनिकी परंपरा संपूर्ण देशात परिचित आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घरातील तरुणाची सैन्यात जाण्याची उर्मी असते; परंतु सैन्यदलांमधील जवानांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर समाज नक्की कुठे निघाला आहे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. आप्पासाहेबांच्या पत्नी सुवर्णा या दि. 28 रोजी सकाळी 9 वाजता स्वयंपाक करत असताना संशयित त्यांच्या घरी आले. त्यांनी घराचा दरवाजा पहारीने तोडला. यावेळी हॉलमध्ये आप्पासाहेब यांचे वडील बसले होते.

ते देखील माजी सैनिक असून त्यांनाही संशयितांनी धमकी दिली. सुवर्णा या वाद सोडवायला गेल्या असता त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संशयितांनी किचनमधील दोन दरवाजे, खिडकी, किचन कट्ट्यावर लावलेल्या टाईल्स फोडून घराची भिंत पाडली. त्यावर न थांबता त्यांना गावात राहू देणार नसल्याची धमकी दिली, अशी माहिती सुवर्णा यांनी दिली. आप्पासाहेब यांच्या कुटुंबाबरोबरचा वाद संशयितांनी सामोपचाराने मिटवायला पाहिजे होते किंवा त्यासाठी असलेल्या सरकारी यंत्रणांकडे दाद मागता आली असती.

मात्र, संशयित सैनिकाची पत्नी, आई-वडील व लहान मुलांवर चालून गेले. भयभीत होऊन घराचे दरवाजे लावून घेणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून घराची नासधूस केली. त्यामुळे आप्पासाहेबांच्या पत्नी सुवर्णा यांनी जिवाच्या भीतीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी आपली कैफियत “प्रभात’कडे मांडली. ही घटना सांगताना त्यांच्या डोळ्यातुन अश्रृंच्या धारा लागल्या होत्या.

पोलीस अधीक्षकांकडून गंभीर दखल
आप्पासाहेब हे 12 वर्षे सैन्यदलात कार्यरत आहेत. त्यांचे वडील शिवाजी वाघमोडे हेदेखील निवृत्त सैनिक आहेत. दोन पिढ्या देशसेवा करणाऱ्या या कुटुंबावर झालेला हल्ला सैनिकी परंपरेचा अभिमान सांगणाऱ्या साताऱ्याला भूषणावह नाही.

दोन पिढ्या सैन्यात
या घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सातारा तालुका पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.