जम्मू : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जम्मू-काश्मीरमधील छावणीत पार्सल बॉम्ब पाठवण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्याप्रकरणी बीएसएफच्याच एका जवानाला अटक करण्यात आली. समरपाल असे त्याचे नाव आहे.
सांबामधील बीएसएफच्या छावणीत पार्सल बॉम्ब पाठवण्यात आला होता. तपासाअंती ते कृत्य समरपालचे असल्याचे उघड झाले. रजेवर जाण्याआधी त्याने छावणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पार्सल बॉम्ब ठेवला. समरपाल हा स्फोटकांच्या हाताळणीत तज्ञ मानला जातो.
त्यानेच आयईडी स्फोटक बनवून त्याचे पार्सल बनवल्याचा अंदाज आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याविषयी असणारा राग व्यक्त करण्यासाठी त्याने ते पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याला बंगालमधील घरातून अटक करण्यात आली. संबंधित घटनेचा अधिक तपशील देण्यात आलेला नाही.