माओवाद्यांचे मिथक बनला हिडमा; संरक्षण दलासाठी मुसक्‍या आवळण्यात अपयश

रायपूर – माओवादी नक्षलवाद्याममध्ये हिडमा हा एक मिथक बनून राहीला आहे. माओवादी लिबरेशन गुरेला आर्मी बटालीयन 1 चा कमांडर असणारा हिडमा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य आहे. ही संघटनाच माओवाद्यांच्या छत्तिसगढमधील कारवाया नियंत्रित करते. हिडमाची बटालीयन बस्तर, बिजापूर, सुकमा आणि दंतेवाडामध्ये कार्यरत आहे. हाच भाग माओवादी आणि सुरक्षा दलातील संघर्षाचा केंद्रबिंदू आहे. 2013 मध्ये झीराम घाटीत झालेल्या हल्लयात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 76 जवान शहीद झाले होते.

तेंव्हापासून प्रत्येक मोठ्या हल्ल्याच्या घटनांत हिडमा प्रत्यक्ष घटनास्थळावर उपस्थित होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अलीकडेच झालेल्या भेज्जी, बुरकापल, मिनपा आणि आता तरेम येथे झालेल्या प्रत्येक हल्ल्याचे नेतृत्व हिडमाने केले होते. त्याच्या डोक्‍यावर छत्तिसगढ सरकारने 25 लाखाचे इनाम जाहीर केले आहे. तर अन्य राज्यांनी 20 लाखांचे इनाम जाहीर केले आहे.

हिडमाच्या व्यक्तीगत जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याचे छायाचित्र उपलब्ध आहे. पण ते त्याच्या 35 ते 45 वयोगटातील आहे. त्यात त्याला जाड मिशा आहेत. हातात एके 47 आहे. त्यात स्पष्टता एवढीच आहे की तो स्थानिक आदिवासी आहे. घनदाट जंगलातील पुवेरती या खेड्यांत त्याचा जन्म झाला. हे खेडे जगरमुडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. हा भाग बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. काही पोलिस कागदपत्रावर त्याचे पहिले नाव मांडवी आहे तर काहीमध्ये ते नाव माडवी असे आहे. पण पोलिसांच्या दृष्टीने तो फक्त हिडमा आहे आणि त्याला काहीही करून पकडायचे आहे.

या भागात काम करणारे पत्रकार आणि शरणागती स्वीकारलेले माओवादी यांना एकत्र करून त्याने संघटनेवर आपले वर्चस्व निर्माण केले. ते त्याची चर्चा दोन स्वरूपातच करतात. एक म्हणजे हल्ले करून सुरक्षा दलाची अधिकाधिक जीवित हानी यशस्वीपणे करण्यात असणारा त्याचा हातखंडा. काही शरणागती स्वीकारलेले माओवादी त्यांच्या या कौशल्यासोबतच नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्याच्या हातोटीचे कौतूक करताना आढळतात. ज्यावेळी त्याच्यावर हल्ले होत असतात त्यावेळी तो कमालीचा शांत असतो, असेही ते सांगतात.

दुसरा महत्वाचा भाग म्हणजे त्याची ओळख. म्हणजे स्थानिक केडरशी असणारे त्याचे संबंध. डीकेएसझेडसीच्या सरचिटणीस सुजातासह छत्तिसगढमध्ये काम करणारे माओवाद्यांच्या केंद्रीय समितीतील टॉप केडर हे बहुतांश तेलंगणातील आहे. मात्र प्रत्यक्ष हल्ला करणारे केडर हे स्थानिक आदिवासी आहेत अणि हिडमा त्यांच्यातील एक आहे. त्यामुळे त्याची संघटनेतील रॅंक वाढली आहे.

त्यामुळेच रामण्णा यांच्या आजारपणाने झालेल्या मृत्यूनंतर त्याच्याकडे दंडकारण्याचा सर्व भाग सोपवला आहे. त्या अर्थाने हिडमा हा माओवादी केडरचा स्थानिक हिरोच आहे. त्यामुळेच त्याच्या भोवती अनेक कथांचे जाळे तयार झाले आहे. माओवाद्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मोठा बंदोबस्त तैनात असणाऱ्या किस्ताराम बाजारपेठेत हिडमा सहजपणे वावरून येतो. आणि त्यामुळे अन्य केडरचे मनोबल वाढते. माओवाद्यांच्या हायरारकीत सुजाता किंवा मध्यवर्ती समितीच्या सदस्यांनतर त्याचे नाव असले तरी त्याचा शब्द अंतिम असतो.

माओवाद्यांचा सरचिटणीस बसवराजू आणि अन्य नेत्यांपेक्षा हिडमाचेच नाव अधिक वेळा समोर येते. सुरक्षा दलांवर एकापाठोपाठ एक हल्ले करण्यात येणाऱ्या बिस्तर भागातील माओवाद्यांच्या हल्ल्यांचा सूत्रधार हिडमाच आहे. त्यामुळे त्याला पकडल्यास बिस्तर भागात माओवाद्यांच्या विश्‍वासाला सुरूंग लागेल.

पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, बाल संघम पातळीपासून माओवादी त्यांचे तात्वज्ञान रुजवण्याचा प्रयत्न करतात. त्यातून नंतर त्यांचे माओवादी केडरचे प्रशिक्षण सुरू होते. ते देणारे बहुतांश आंध्र प्रदेश किंवा तेलंगणामधील असतात. त्यामुळे आदिवसी केडरमध्ये माओवादी केडरएवढी तात्विक बैठक नसते. त्यांच्यासाठी हिडमा हीच एक प्रेरणा असते. त्याने युध्दभूमी सोडली तर त्या संघटनेचा कणाच मोडून पडेल.

हिडमाचा माग काढणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या भोवती तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असते. जंगलातील रस्त्यापासून खूप आत तो राहतो. तो ज्यावेळी कारवाया करायच्या असतील त्याचवेळी तो आपल्या बटालीयनसह हालचाली करतो. जंगलातच लहानाच मोठा झाल्याने त्याला या जंगलाची खडान्‌ खडा माहिती आहे. त्यामुळेच त्याचा माग काढणे कठीण जाते.

या जंगलात अनेक ठिकाणी मोबाईलची रेंज नाही. त्यामूळे मानवी हस्तकांकडून मिळणारी माहिती काही दिवसांपुर्वीची असते. त्याशिवाय रस्त्यांच्या जाळ्या अभावी फौजफाटा पोहोचायला उशीर होतो. नद्या, दऱ्या आणि तीव्र उन्हाच्या झळा यामुळे फौजांचा वेग मंदावतो. त्याच्या बटालीयन 1 मुळे या समुग्रीशिवाय त्याला समोरे जाता येत नाही.

त्याची तीन स्तरीय संरक्षण व्यवस्था म्हणजे त्याला गाफील पकडणे अशक्‍यच आहे. त्याच्या दिशेने वाटचाल सुरू करताच माओवादी सभोवतालचे जंगल पेटवून देता. त्यामुळे हिडमा सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी होतो. पोलिस म्हणाले, ते हिडमाच्या जवळपास केवळ जून 2017 मध्ये पोहोचू शकले होते. त्यावेळी त्याने भेज्जी आणि बुरकापलमध्ये केलेल्या हल्ल्यात 38 जवान मरण पावले होते. त्यावेळी राबवलेल्या मोहिमेत सात ते 18 माओवादी मरण पावले होते. त्यावेळी हिडमा मरण पावला अशी वदंता उठली. पण ते खरे नव्हते. त्यामुळे सुरक्षा दलासाठी आता रणभूमी बस्तर झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.