पुणे – पुणे शहरातील डॉ. वृषाली भोसले यांची प्रतिष्ठेच्या जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धा समितीवर उपाध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
राज्यातील वयोगटातील हॉकी स्पर्धा आणि महिला हॉकीला प्रोत्साहन देण्यात त्यांचा पुढाकार, तसेच नेहरु ऑल इंडिया आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेच्या मुख्य पुरस्कर्त्या या नात्याने त्या परिचीत होत्या. यामुळेच या प्रतिष्ठेच्या स्पर्धा समितीच्या उपाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव पुढे आले. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून 1964 पासून नेहमीच हॉकी खेळाचा प्रचार आणि प्रसार याला प्राधान्य देण्यात आले आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनाचाही समावेश आहे.
या विषयी बोलताना डॉ. वृषाली म्हणाल्या, या निवडीमुळे मला खूप आनंद झाला आहे. मला या पदासाठी जबाबदार समजले यासाठी मी जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धा समितीचे आभार मानते. किशोर, कुमार तसेच राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळाच्या प्रसारासाठी मला नेहमीच जवाहरलाल नेहरु स्पर्धा समितीने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. या सर्व आघाड्यांवर हॉकी खेळाचा प्रसार करण्याचा माझा आणि समितीचा एकच दृष्टिकोन आहे. समितीचे उपाध्यक्षपद हा माझा अभिमान आहे.