जावळेवाडीकरांचा जीव ‘रामभरोसे’

ओढ्यावरील भराव वाहून गेल्याने पाण्यातूनच मार्गक्रमण

राजगुरूनगर – जावळेवाडी (मंदोशी ता. खेड) येथील प्राथमिक शाळेजवळील भराव पुरात वाहून गेला असल्याने वाडीला जाण्यासाठी दुसरा रस्ता नसल्याने येथील नागरिकांचा जीव “रामभरोसे’ झाला आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शाळेजवळ ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह आला असून या प्रवाहात जर कोणी वाहून गेल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मंदोशी येथील विकासापासून दुर्लक्षित असलेल्या जावळेवाडीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत 10 तर अंगणवाडीत सुमारे 10 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर 100 लोकवस्ती असलेली ही वाडी आहे. दरम्यान, शाळेच्या मागील बाजुजवळ विहीर आहे. विहिरीच्या लगत हा मोठा ओढा वाहत असून यातूनच विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मार्गक्रमण करावे लागत असल्याने त्यांचा जीव धोक्‍यात आला आहे. याबाबत गावातील नागरिकांनी महसूल, पंचायत समिती व जिल्हा प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून देवूनही याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थ जीव मुठीत धरून दिवस काढत आहेत.

जावळेवाडीत जाण्यासाठी अजूनही रस्ता नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. मंदोशी घाटापासून सुमारे दीड किलोमीटर जावळेवाडी आहे येथे जाण्यासाठी सुमारे 7 वर्षांपासून रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर घाटापासून पुढे काही अंतरावत ओढा आहे. या ओढ्यावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पूल बांधण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. मात्र, पुढे वाडीत जाण्यासाठी पुन्हा हाच ओढा असल्याने तेथे पूल नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय
होत आहे.

अहवालात भूस्खलनाचा धोका असल्याचे नमूद
या वाडीला भूस्खलनाचाही मोठा धोका आहे. आंबेगाव तालुक्‍यातील माळीण दुर्घटना झाल्यानंतर या गावाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. वरिष्ठ भूवैज्ञानिकांद्वारे या गावातील सर्वेक्षण झाल्यानंतर त्यांनी याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सादर केला होता. त्यात जावळेवाडीला भूस्खलनाचा धोका होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. खोल दरीत असलेल्या या वाडीतील नागरिकांना पावसाळ्यात भीतीच्या दडपणात राहावे लागत आहे. वाडीतील शेतकऱ्यांची शेती शेजारील डोंगररांगांमध्ये असल्याने येथे ग्रामस्थवस्ती करून राहत आहेत.

आम्ही राहत असलेल्या वाडीमधील नागरिकांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात जाण्या-येण्याचा रस्ता वाहून गेला आहे. जीव मोठीत धरून शाळेत जा-ये करावी लागत आहे. गावातील नागरिकांची प्रशासनाने गैरसोय थांबवावी व आवश्‍यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
– सरपंच बबन गोडे, सरपंच, जावळेवाडी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.