नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता भारताचा स्टार भालाफेकपटू निरज चोप्रा याच्या फिनलॅंडमधील सरावाला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक समितीने मंजुरी दिली आहे.
पुढील महिन्यापासून निरजला विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागीही व्हायचे असून त्यासाठी अत्याधूनिक व अद्ययावत सुविधांसह सरावाची गरज आहे. फिनलॅंडमधील कुओर्त ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रात तो सराव करणार असून हा सर्व खर्च केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची ऑलिम्पिक समिती करणार आहे.
नीरज सध्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असून अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. निरजला यंदाच्या वर्षी 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद राखायचे आहे. तसेच टोकियोत मिळालेले सुवर्णपदक पॅरिसमध्येही मिळवायचे आहे.