नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या भाल्याला लिलावात सर्वात जास्त बोली लावली गेली.
भालाफेक स्पर्धेत जो भाला फेकून नीरजने इतिहास रचला होता तो त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिला होता. त्यानंतर मोदींना भेट म्हणून आलेल्या सर्व वस्तूंचा ई-लिलाव करण्यात येत आहे.
या लिलावात नीरजच्या भाल्यावर तब्बल दीड कोटींची बोली लागली. हा लिलाव मोदी यांच्या वाढदिवसापासून (17 सप्टेंबर) सुरू होता. सर्व भेटवस्तूंपैकी नीरजच्या भाल्यावर सर्वात जास्त बोली लागली आहे. हा ऑनलाइन लिलाव गुरुवारी संपला. या लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पाला देण्यात येईल.
जरी लिलाव संपला असला तरीही मोदी यांना मिळालेल्या एकूण 1348 भेटवस्तूंपैकी काही वस्तू अद्याप विकल्या गेलेल्या नाहीत.