मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडचे अनेक कलाकार शाहरुखला जाहीर समर्थन देत आहेत. यामध्ये प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचाही समावेश आहे. त्यांनी या प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रेटींना तपासाच्या नावाखाली जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे, असे विधान जावेद अख्तर यांनी केले. यावेळी त्यांनी शाहरुखसह आर्यनलाही समर्थन दिले.
मुंबईतील जुहू परिसरात चेंजमेकर्स या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला जावेद अख्तर यांनी हजेरी लावली. यावेळी दिलेल्या मुलाखतीदरम्यान प्रसारमाध्यमांनी त्यांना शाहरुख आणि आर्यन खानच्या अटकेबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी जावेद अख्तर यांनी थेट यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी त्यांनी शाहरुखाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे.
#WATCH | I've not seen any headline on recovery of cocaine worth 1 billion dollars at a port but the recovery of charas or ganja worth 1.30 lakh has become national news. This is the price film industry has to pay for being high profile: Lyricist Javed Akhtar in Mumbai pic.twitter.com/OmaO2UsQL7
— ANI (@ANI) October 19, 2021
“काही दिवसांपूर्वी एका बंदरावर (अदानीचे बंदर) एक अब्ज डॉलर्स किमतीचे कोकेन सापडले होते. तर दुसरीकडे त्याचवेळी एका क्रूझवर १२०० लोकांची तपासणी केली जाते. त्यावेळी त्या ठिकाणी दीड लाख किंमतीचे चरस सापडतो. क्रूझवर अंमली पदार्थ सापडले ही एक मोठी राष्ट्रीय बातमी होते.मात्र दुसरीकडे अब्ज डॉलर्स कोकेन सापडले त्याची साधी हेडलाईनही कुठे पाहायला मिळत नाही. काही ठिकाणी ही बातमी पाचव्या किंवा सहाव्या पानावर छापलेली दिसते. यानंतर मग असं म्हटलं जाते की, आम्ही यापुढे जहाजाला या बंदरावर येऊ देणार नाही. अरे पण यापूर्वी तुम्हाला जे मिळालं आहे, त्याबद्दल तर बोला,” असे विधान जावेद अख्तर यांनी केले.
यापुढे जावेद अख्तर म्हणाले, “बॉलिवूड इंडस्ट्री हायप्रोफाईल असल्याची किंमत चुकवत आहे. जेव्हा तुम्ही हायप्रोफाईल असता, त्यावेळी तुम्हाला खाली खेचण्यास, तुमच्यावर दगडफेक करण्यास, चिखलफेक करण्यास सर्वांना आनंद मिळतो. पण जर तुम्ही कोणीही नसाल, तर मग तुमच्यावर चिखलफेक करण्यास कोणाला आनंद मिळेल?” असा सवालही जावेद अख्तर यांनी उपस्थित केला.