दिल्लीत ३ टक्क्यांचं गणित फसल्याने भाजपचा पराभव; जावडेकरांनी केली ‘उकल’ 

पुणे :  दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून राजधानीमध्ये सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये संपूर्ण ताकद झोकून दिल्याने ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकतो याबाबत कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले होते. मात्र दिल्लीकरांनी ही निवडणूक एकतर्फी करत सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या पारड्यात ६२ जागा टाकल्या.

दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिल्ली विधानसभेतील भाजपच्या पराभवाची चिरफाड करताना हे खापर काँग्रेसच्या माथ्यावर फोडलं आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना जावडेकर यांनी, ‘काँग्रेस निवडणुकीच्या रणांगणातून अचानक गायब झाल्याने भाजपला पराभवाचा धक्का बसला.’ असा दावा केला.

काय आहे ३ टक्क्यांचं गणित

निवडणुकांमधील पराभवाची गणितीय मांडणी करताना जावडेकर यांनी,  “काँग्रेसच्या गायब होण्यामुळं आमची निकालांसंबंधीची आकडेमोड प्रत्येकी ३ टक्क्याने चुकली. आम्ही या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला ४८ टक्के तर भाजपला ४२ टक्के मतं पडतील असा अंदाज बांधला होता. मात्र आमचं हे गृहीतक प्रत्येकी ३ टक्क्यांनी चुकल्याने आपला ५१ टक्के तर भाजपला ३९ टक्के मतं मिळाली.” अशी उकल केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.