विधानसभेआधी राजकीय पक्षांच्या यात्रांची “जत्रा’

सुरेश डुबल
कराड – विधानसभेचे बिगुल वाजण्यास काही महिने शिल्लक असताना राज्यात राजकीय पक्षांच्या यात्रांचीच जत्रा पहावयास मिळत आहे. भाजप-सेना यांनी वेगवेगळी यात्रा काढली असून आता राष्ट्रवादीसह राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही यात्रेची घोषणा केली आहे. या घडामोडींमूळे राज्यातील वातावरण ढवळून निघणार आहे.

काहीही करून राज्यात आपली सत्ता आणायची, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. याचाच एक भाग म्हणून आता लोकांमध्ये समरस होण्यासाठी जनयात्रांचे आयोजन राजकीय पक्षांनी केले आहे. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली “महाजनादेश यात्रा’ 1 ऑगस्ट पासून सुरु केली आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून यात्रेस प्रारंभ झाला. याचा समारोप 31 ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे. भाजपला टक्कर देणार नाही ती सेना कसली? युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवसेनेने देखील जनआशीर्वाद यात्रा 18 जुलै पासूनच सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी व ज्यांनी मतदान केले नाही, त्या मतदारांचे मने जिंकून आशीर्वाद घेण्यासाठी या यात्रा काढली आहे.

आता दोन सत्ताधारी पक्ष अशा यात्रा काढून लोकसंवाद व संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याने, विरोधक तरी कसे गप्प बसतील. विरोधकांनीदेखील या यात्रांना छेद देण्यासाठी यात्रेतूनच उत्तर देण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेने विरोधकांना उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व खा. अमोल कोल्हे हे 6 ऑगस्टपासून ही यात्रा सुरु करणार आहेत. छ. शिवरायांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर येथे यात्रेचा नारळ फुटणार असून स्वराज्याची राजधानी रायगड येथे समारोप होणार आहे. पूर्वी भाजपचे मित्र असलेले व नंतर कट्टर विरोधक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीदेखील सरकारच्या विरोधात मोर्चा खोलला आहे. मुख्यमंत्र्यांनी अकरा प्रश्नांची उत्तरे द्यावीत, यासाठी राज्यभर ते आक्रोश मोर्चा काढणार आहेत.

निवडणुका आल्या की राजकीय पक्षांसह पुढाऱ्यांना जनतेची आठवण होते. मतदारराजा हाच आमच्यासाठी देवता आहे अशा आणाभाका ते जाहिर भाषणांत घेतात. त्यामुळेच निवडणुका आधी वातावरण निर्मिती करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जनतेला आपल्या बाजूने वळवण्यासाठी खटाटोप सुरू आहे. निवडणुका झाल्या की आमदार फिरकत नाही, पण निवडणुकीआधी मतदार राजाचे पाय धरण्याची संधी उमेदवार सोडत नाहीत. एकदा का निवडणूक झाली की, तो आमदार मतदाराला आपल्या पायापाशी देखील उभा करत नाही. ही राजकीय वस्तुस्थिती आहे. सध्या या यात्रेच्या माध्यमातून जनतेला कसे बाटलीत उतरवता येईल, यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. यामुळे राज्याला यात्रेचे नव्हे तर, जत्रेचे स्वरूप येऊ लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.