कर्जबुडवण्याच्या प्रकरणात जतीन मेहतावर आणखी दोन गुन्हे

नवी दिल्ली – बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि युनियन बॅंक ऑफ इंडियाचे 587 कोटी रूपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेला हिरे व्यापारी जतीन मेहता याच्या विरोधात सीबीआयने आज आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. मेहताने बॅंक ऑफ महाराष्ट्रचे 323 कोटी 40 लाखांचे कर्ज बुडवले असून बाकीचे कर्ज युनियन बॅंक ऑफ इंडियाचे आहे. या दोन्ही बॅंकांच्या तक्रारीवरून सीबीआयने त्याच्या विरोधात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

जतीन मेहता याच्या खेरीज कंपनीच्या अन्य काही संचालकांवरही या प्रकरणात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आपल्यावरील कारवाईची कुणकुण लागताच मेहता या आधीच विदेशात फरारी झाला आहे. मेहताच्या कंपनीने देशातील 14 राष्ट्रीयकृत बॅंकांच्या मार्फत एकूण चार हजार 600 कोटी रूपयांचे कर्ज घेतल्याचे सांगण्यात येते. विनसम डायमंड या कंपनीच्या नावावर हे कर्ज घेण्यात आले असून या कंपनीचा मुळ प्रवर्तक हाच जतीन मेहता हा आहे.

तथापी त्याने एप्रिल 2011 मध्ये या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून राजीनामा दिला आहे. त्यानंतर तो नॉन एक्‍झिक्‍युटीव्ह संचालक म्हणून या कंपनीच्या संचालक मंडळावर काम करीत असल्याचे तपासात आढळून आले आहे. तो सध्या सेंट किट्‌स या बेटावर राहात असल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×