टीम इंडियाचा यॉर्कर किंग अशी ओळख असलेल्या जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाने 2 खेळाडूंना मागे टाकत मोठा बहुमान मिळवला आहे.त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेन पीटरसन या दोघांना मागे टाकत हा बहुमान मिळवला आहे.
आयसीसी प्लेअर ऑफ मंथ डिसेंबर 2024
जसप्रीत बुमराहने आयसीसी प्लेअर ऑफ मंथ डिसेंबर 2024 हा पुरस्कार जिंकला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. आयसीसी एका महिन्यातील कामगिरीच्या जोरावर टॉप 3 खेळाडूंना ‘प्लेअर ऑफ मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन देतं. त्यानुसार आयसीसीने डिसेंबर महिन्यातील पुरस्कारासाठी पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह आणि डेन पीटरसन या तिघांना नामांकन दिले होते.
अखेर पॅट कमिन्स आणि डेन पीटरसन याना मागे टाकत भारताच्या जसप्रीत बुमराहने बाजी मारत आपण सरस असल्याचं सिद्ध करुन दाखवलं आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
बुमराहची डिसेंबर महिन्यातील कामगिरी
बुमराहने डिसेंबर महिन्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील एकूण 3 सामने खेळले. बुमराहने या 3 सामन्यांमध्ये 14.22 च्या एव्हरेजने एकूण 22 विकेट्स घेतल्या. तसेच बुमराहने या मालिकेत एकूण 32 विकेट्स घेतल्या. बुमराहला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार’ देण्यात आला. बुमराहने बॉलिंगसह निर्णायक क्षणी बॅटिंग करत गेमचेंजिग भूमिका बजावली होती.
बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार?
बुमराहला सिडनीत झालेल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात पाठीला दुखापत झाली. त्यामुळे बुमराहला दुसऱ्या डावात बॉलिंग करता आली नाही. या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.