नवी दिल्ली -भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत 1.38 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
बीसीसीआयने खेळाडूंसाठी तयार केलेल्या केंद्रीय करार पद्धतीनुसार चार श्रेणी केल्या आहेत. त्यात बुमराह ए प्लस श्रेणीत आहे. ए प्लस, ए, बी व सी अशा चार श्रेणी तयार केल्या आहेत.
ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना बीसीसीआय एका कसोटी सामन्याचे 15 लाख, एका एकदिवसीय सामन्याचे 6 लाख तर, एका टी-20 सामन्याचे 3 लाख रुपये देते. बुमराहने यंदाच्या वर्षात आतापर्यंत 4 कसोटी, 8 टी-20 व 9 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
यानुसार बुमराहने आतापर्यंत 1 कोटी 38 लाखांची कमाई केली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 3 कसोटी, 9 एकदिवसीय तसेच 10 टी-20 सामने खेळले असून त्याची कमाई 1 कोटी 29 लाखांची आहे.
बुमराह आणि कोहलीनंतर या यादीत रवींद्र जाडेजा 96 लाखांसह तिसऱ्या स्थानावर आहे. हिटमॅन रोहित शर्मा यंदा दुखापतीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकला होता त्यामुळे त्याला यंदा सर्वोत्तम पाच खेळाडूंत स्थान मिळाले नाही.