सिडनी – भारतीय संघाच्या मागे लागलेले खेळाडूंच्या दुखापतींचे शुक्लकाष्ट अद्याप संपण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही दुखापत झाल्यामुळे चौथ्या कसोटीतून त्याने माघार घेतली आहे. त्यातच रविचंद्रन अश्विनलाही दुखापत झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता चौथ्या कसोटीत भारतीय संघात कोण खेळेल असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज बुमराहाला सिडनी कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना एबडोमिनल स्ट्रेनचा त्रास झाला. त्यामुळे त्याला चौथ्या कसोटीत खेळता येणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
हा सामना येत्या शुक्रवारपासून ब्रिस्बेन येथे होणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर बुमराहचे स्कॅन करण्यात आले. स्कॅनमध्ये स्ट्रेन दिसून येत आहेत. मायदेशात होत असलेल्या आगामी इंग्लंड दौऱ्याचा विचार करुन चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहाला विश्रांती देण्यात येणार आहे.