मुंबई – ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. आता त्याच्या जागी सनरायझर्स हैदराबादने इंग्लंडचा आक्रमक खेळाडू जेसन रॉयला करारबद्ध केले आहे.
मार्शला बायोबबलमध्ये जास्त काळ राहायचे नव्हते. काही दिवसांपूर्वी त्याने बीसीसीआय आणि हैदराबादला आपल्या स्पर्धेतील माघारीची कल्पना दिली होती. हैदराबादने मार्शच्या जागी इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयला आपल्या संघात घेतले असून, सुरुवातीला या स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात एकाही संघाने रॉय याच्यावर बोली लावली नव्हती. मात्र, भारताविरुद्धच्या मालिकेत अफलातून कामगिरी केल्यावर त्याच्याकडे संघ मालकांचे लक्ष गेले.
रॉय 2017 साली गुजरात लायन्सकडून तर,2018 साली दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएल स्पर्धेत सहभाग घेतला होता. आयपीएलच्या बायोबबलच्या नियमानुसार मार्शला भारतात दाखल झाल्यावर सात दिवस विलगीकरणात राहावे लागणार होते. त्याला हैदराबादने 2 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले.
मात्र, गेल्या मोसमात तो दुखापतीमुळे जास्त काळ संघाबाहेर होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या गेल्या वर्षीच्या पहिल्याच सामन्यात मार्शच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.