ग्रेसच्या जन्मदिनानिमित्त सादर केले लोकप्रिय गीतगानतपस्विनी धोंडूताई कुलकर्णी आणि गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे शिष्यत्व लाभलेला जशन भूमकर हा पुण्यातला एक तरूण गायक आहे. त्याने अनेक गाजलेल्या ठुमरी दादरा आणि गज़लना, आजच्या पिढीशी साजेसा स्वरसाज दिलेला आहे. याच जशन भूमकरने आज कवी ग्रेस यांचे ‘भय इथले संपत नाही…’ हे गाणे आपल्या आवाजात सादर केले आहे.
यानिमित्ताने त्याने त्याचे मनोगतही प्रसिद्ध केले आहे.जशन म्हणतो…आज 10 मे 2021 रोजी मी आपल्या समोर ‘भय इथले संपत नाही’… हे मराठी साहित्यातील नावाजलेल्या कवी ग्रेस यांच्या कवितेवरील आधारित गाणे घेऊन येत आहे. मुळ गाणे भारतरत्न लता मंगेशकरजी यांनी गायलेलं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी चालबध्द केलेलं आहे. हृदयनाथजीचे कवी ग्रेस यांच्यावर अफाट प्रेम होते आणि त्यांनी कवी ग्रेस यांच्या अनेक कवितांना चाली दिल्या. मी स्वतःला भाग्यवान मानतो की, अनेक वर्षांपूर्वी लताजींनी गायलेलं हेच गाणं जगासमोर आणलं होतं.
भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते…
ह्या ओळींमध्ये अत्यंत दुःखदायी भावना कवी ग्रेस यांनी व्यक्त केली आहे. अनेक लोकांना वाटते की, कवीने ह्या ओळी कुठल्यातरी प्रियकर्त्याला संबोधून लिहिल्या आहेत; पण खरं तर त्यांनी लहानपणीच सोडून गेलेल्या आपल्या आईला संबोधून या ओळी लिहिल्या आहेत.एक संवेदनशील कलाकार आपल्या आजूबाजूच्या वातावरणापासून अलिप्त राहू शकत नाही. सध्याच्या कोविड-19 च्या महामारीने झपाटलेल्या आपल्या देशाच्या परिस्थितीत आपण सर्वांनी काही ना काही गमावल्याचा आभास अनुभवला आहे.कवी ग्रेस यांना हे गाणं लिहिण्याच्या वेळेस कदाचित अशाच भावना जाणवल्या असतील. माझं गाणं त्या सर्व लोकांना समर्पित आहे ज्यांची आठवण आपल्याला सदैव येत राहील.
-जशन भूमकर