सातारा -जिल्हा परिषद कॉलनी, शाहूपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका श्रीमती रत्नमाला विजयसिंह भोसले यांनी आपल्या वयाच्या 76 व्या वर्षातही समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपली आहे. करोनाच्या संकटात शाहूपुरी ग्रामविकास आघाडी आणि कट्टा ग्रुप करत असलेल्या प्रयत्नांना मदत म्हणून पती कै. विंजयसिह भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, आपल्या पेन्शनच्या रक्कमेतून पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशिन त्यांनी संघटना प्रतिनिधींकडे सोपवल्या.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे सरकारी, खाजगी दवाखाने, खाजगी स्वरुपात उभी केलेली करोना सेंटर्सही अपुरी पडू लागली आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध नाही. ऑक्सिजन सुविधा, व्हेंटिलेटर अभावी कितीतरी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत व कितीतरी रुग्ण आपल्या घरीच किंवा रुग्णालयाच्या दाराशी मृत्यूशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत काही सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन घरच्याघरी असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन मशिन अभावी आपला जीव गमवावा लागू नये म्हणून संबंधितांच्या नातेवाईकांना मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशिन उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहेत.
अशाच या कार्यात पुढाकार घेतलेल्या शाहूपुरी ग्रामविकास आघाडी व कट्टा ग्रुपसारख्या सामाजिक संघटनांनी सदरची मशिन या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला होता. त्याला सहकार्य म्हणून जिल्हा परिषद कॉलनी, शाहूपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका श्रीमती रत्नमाला विजयसिंह भोसले यांनी समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या संघटनांना आपले पती कै. विंजयसिह भोसले यांचे स्मृतिप्रीत्यर्थ, आपल्या पेन्शनच्या रक्कमेतून पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशिन या संघटना प्रतिनिधींकडे आपल्या नातवंडांचे हस्ते सोपवल्या.
नवपिढीला प्रत्यक्ष कृतीतून दातृत्वाचा संस्कारही देण्याचा श्रीमती भोसले यांनी प्रयत्न केला. यापूर्वीही या शिक्षिकेने शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्या उभारणीतही वेळोवेळी आपल्याजवळील असणारी पुंजी ऐन आर्थिक संकटात मदत स्वरुपात देऊ केली होती. त्यांच्या या असामान्य त्यागावरचं आजचे हे विद्यालय उभे आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
त्यामुळेच श्रीमती भोसले यांचे हे सामाजिक कार्यातील योगदान हे समाजासाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही, अशा शब्दांत ग्रा.पं.सदस्य राजेंद्रकुमार मोहिते व कट्टा ग्रुपचे संकेत परामणें यांनी आपल्या भावना व्यक्त करुन या दातृत्वभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.या मशिन्सचा उपयोग एका जरी रुग्णाला झाला तर हेच माझ्यासाठी समाधान असेल अशा भावना यावेळी श्रीमती रत्नमाला भोसले यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी भारत भोसले, ग्रा. पं. सदस्या सौ. शोभाताई केंडे, सौ. माधवीताई शेटे, जगदीश भोसले, अभय भोसले, सुरेश शेटे, भैय्या पाटणे, धनंजय खोले, अजय भोसले, आशुतोष भोसले, अथर्व भोसले, निशांत केंडे आदी उपस्थित होते.