टोकियो – करोना विषाणूंचा धोका असल्याने जागतिक स्तरावरच नव्हे तर देशांतर्गत स्पर्धादेखील रद्द कराव्या लागल्या आहेत, तसेच काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, या सगळ्या परिस्थितीत ऑलिम्पिक स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणारच असे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी स्पष्ट केले आहे.
चीनमार्फत जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूंचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा तसेच ही स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी यासाठी जागतिक स्तरावरून दबाव वाढत असला तरीही ही स्पर्धा ठरल्याप्रमाणे होणारच असे अबे यांनी निर्धारपूर्वक सांगितले आहे.
रविवारी अबे यांनी क्रीडा ग्राम तसेच स्पर्धेसाठीची मैदाने व तयारी यांची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ऑलिम्पिक स्पर्धा येत्या जुलै महिन्यात होत आहेत, त्यामुळे खूप मोठा कालावधी हातात आहे. अमेरिकेचा दबाव असला तरीही ही स्पर्धा बिनधोकपणे पार पडेल तसेच कोणालाही करोनाचा धोका होणार नाही याची आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊ, असेही अबे यांनी सांगितले.