नवी दिल्ली – अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी उद्योजक नेस वाडिया यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा जपानमधील कोर्टाने सुनावली आहे. उत्तर जपानमधील होक्काइदो येथील विमानतळावर नेस वाडियाला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यावेळी तपासणी दरम्यान नेस वाडियाकडे २५ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ आढळले होते.
नेस वाडिया हा नसली वाडिया यांचा मोठा पुत्र आहे. तसेच नेस वाडिया हा किंग्स इलेव्हन पंजाब या आयपीएल मधील संघाचा सहमालक देखील आहे. ब्रिटानिया, गो एअर आणि बॉम्बे डाइंग सारख्या कंपन्या या वाडिया समूहाच्या मालकीच्या आहेत.
यापूर्वी, बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने चार वर्षापूर्वी नेस वाडिया विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान जर नेस वाडीया याने माफी मागितली तर आपण समझोता करण्याची तयारी प्रिती झिंटाने दर्शविली होती.