वॉशिंग्टन: जपानी चित्रपट आणि टिव्ही वरील कार्यक्रमांमधील गाजलेले कलाकार हरुआ मिरुआ यांचे गूढरितीने निधन झाले असल्याचे उघड झाले आहे. जपानमधील वृत्तसंस्था आणि हॉलिवूडमधील घडामोडींशी संबंधित असलेल्या अमेरिकेतील वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. हरुआ हे अवघे 30 वर्षांचे होते. “अटॅक ऑन टायटॅन’ या साहसपटातील मध्यवर्ती भूमिकेमुळे ते विशेष चर्चेत आले होते.
टोकियोमधील मिनाटो वॉर्ड येथील घरामध्ये मिरुआ मृतावस्थेत आढळले. रुग्णालयात नेल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या अकस्मित मृत्यूमागील कारणांचा शोध टोकियोतील महानगर पोलीस घेत असून आत्महत्येची शक्यता पडताळून पाहिली जात असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
1990 साली टोकियोमध्ये जन्म झालेल्या हरुआ मिरुआ टिव्हीवरील जपानी मालिकांमधून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. “कॅच द वेव्ह ऍन्ड द चिल्ड्रेन’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. “द लास्ट सिंड्रेला’, “नेव्हर लेट मी गो’, “ऍडल्ट स्कूल’ , “डायिंग आय’ आणि “टू वीक्स’ हे त्यांचे टिव्हीवर अलिकडेच लोकप्रिय झालेले चित्रपट होते.
“एयेन नं झिरो’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिरुआ यांना जपानी अकॅडमीचे 2013 साठीचे नामांकनही मिळाले होते. “किनले बूटस’ या गाजलेल्या इंग्रजी नाट्यकृतीचे जपानी रुपांतर असलेल्या नाटकात मिरुआ यांनी केलेली ड्रॅग क्वीनची भूमिका विशेष लोकप्रिय झाली होती. सध्या ते “ब्रेव्ह गुनियो सेंकी’ आणि “घोस्ट हंट’ या साहसपटांचे चित्रीकरण करत होते.