टोकियो – दक्षिण पूर्व आशियात धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असून तोथील जपानी नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत, असा इशारा जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.
धार्मिक आणि गर्दीच्या ठिकाणी अशाप्रकारचे आत्मघातकी बॉम्बहल्ले होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
आज देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार जपान, फिलीपाईन्स. इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि म्यानमारमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची दहशतवाद्यांची योजना असल्याचे म्हटले गेले आहे.
ज्या देशांना अशाप्रकारचा कोणताही धोका अद्याप जाणवलेला नाही, अशा देशांनाही जपानने या इशाऱ्याद्वारे सावध केले आहे. जपानने हा इशारा कशाच्या आधारे दिला आहे याचा तपशील दिलेला नाही असे थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते तानी संग्रात यांनी म्हटले आहे.
हा इशारा केवळ थायलंडसाठी नसल्याचेही जपानने म्हटलेले आहे. मात्र त्यासंदर्भातील कोणताही अन्य तपशीलही जपान दूतावासाने दिलेला नसल्याचेही संग्रात यांनी सांगितले.
थायलंडच्या पोलिसांकडे अशा प्रकारची कोणतीही गुप्त माहिती उपलब्ध नसल्याचे पोलिस प्रमुख किसाना पथानाचारोयन यांनी म्हटले आहे.
त्याचप्रमाणे अशा कोणत्याही धोक्याची पूर्वकल्पना नसल्याचे फिलीपाईन्सच्या परराष्ट्र मंत्रालयानेही म्हटले आहे. तर जपानच्या नागरिकांसाठी अशा प्रकारची कोणतीही मार्गदर्शक सूचना दिली गेली असल्याचे इंडोनेशियातील परराष्ट्र मंत्रालयाने नाकारले आहे.