टोकियो – चीनच्या अंतराळ आणि सायबर हल्ल्यांना रोखण्यासाठी जपान आणि व्हिएतनामने हातमिळवणी केली आहे. स्पेस आणि सायबर सुरक्षेबाबतचा हा करार तातडीची गरज म्हणून करण्यात आला आहे, असे जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हिंद- प्रशांत क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला निर्माण होत असलेल्या धोक्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा करार करण्यात आला आहे, असे किशी म्हणाले. कोणत्याही देशाचे नाव न घेता हा धोका चीनमुळेच निर्माण झाला असल्याचे किशी यांनी सूचित केले. व्हिएतनामचे संरक्षण मंत्री फान वान गियांग यांच्याबरोबर संरक्षण भागीदारीची चर्चा समाधानकारक झाली असल्याचेही किशी म्हणाले.
जपानचे नियंत्रण असलेल्या सेन्काकू बेटांजवळ चीनच्या तटरक्षक दलाच्या बोटी सातत्याने आढळून आल्या आहेत. याबद्दल जपानने सातत्याने आक्षेप देखील घेतलेला आहे. या बेटांवर चीनने देखील दावा केलेला आहे. चीनकडून या बेटांना दियावू असे संबोधले जाते. चीनच्या नौकांकडून सातत्याने जपानच्या सागरी हद्दीचे उल्लंघन केले जात असते असा आक्षेपही जपानकडून घेतला जातो आहे.
चीनी नौकांकडून अधूनमधून जपानच्या मासेमारी नौकांनाही धमकावले गेले आहे. जपानच्या सागरी हद्दीमध्ये आणि हवाई हद्दीतही चीन आणि रशियाकडून युद्धसराव होत असल्याबद्दल किशी यांनी चिंता व्यक्त केली आहे. जपानकडून अलिकडेच व्हिएतनामला युद्धसामुग्री आणि संरक्षण तंत्रज्ञान देण्याबद्दलचा करारही केला आहे.