किव्ह – जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा हे अचानक युक्रेनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग रशियाच्या दौऱ्यावर गेले असतानाच किशिदा तीन दिवसांसाठी युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत. एकीकडे जिनपिंग-पुतीन आणि दुसरीकडे किशिदा-झेलेन्सकी अशा दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. मात्र या दोन्ही बैठकांपैकी एखाद्या बैठकीमुळे रशिया-युक्रेन युद्धाचे रंग बदलण्याची शक्यता फारच धूसर आहे. या युद्धामुळे जगातील अनेक देश यापैकी एका गटाच्या पाठिमागे उभे राहिले आहेत.
गेल्या 13 महिन्यांपासून रशियाच्या आक्रमणाला तोंड देत असलेल्या युक्रेनच्या नागरिकांच्या धैऱ्याबद्दल किशिदा आदर व्यक्त करणार आहेत. तसेच अध्यक्ष झेलेन्सकी यांच्या नेतृत्वाचेही ते कौतुक करण्याची शक्यता आहे. “जी-7′ गटाचे अध्यक्ष या नात्याने या युद्धामध्ये युक्रेनला असलेला जपानचा पाठिंबा ते व्यक्त करतील, असे जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पोलंडच्या मार्गे रेल्वेतून किशिदा युक्रेनची राजधानी किव्हमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या समवेत युक्रेनचे निवडक अधिकारी होते. भारत भेटीवर असताना किशिदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नियमांवर आधारीत आंतरराष्ट्रीय रचनेवर भर दिला होता. तसेच युक्रेन रशिया युद्धादरम्यान युक्रेनला मदत करण्याची भूमिका मांडली होती. या दोन्ही मुद्यांमधून त्यांनी रशिया आणि चीनलाही लक्ष्य केले होते.
“पाकिस्तानच्या नकाशामध्ये…” शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीतून पाकची माघार
चीन आणि रशिया या दोन्ही देशांशी जपानचा सीमावाद सुरू आहे. चीनने जपानच्या सागरी हद्दीजवळ युद्धसराव केल्यामुळे जपानला असुरक्षित वाटू लागले आहे. दुसरीकडे रशियाला चीनकडून शस्त्रे मिळण्याची शक्यता गुप्तचरांनी व्यक्त केली आहे.
जिनपिंग- पुतीन यांच्यात मैत्रीपूर्ण चर्चा
दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे काल मॉस्कोमध्ये स्वागत केले. पुतीन आणि जिनपिंग यांच्यात मैत्रीपूर्ण वातावरणात अनेक विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. जिनपिंग यांनी आज रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन यांच्याशीही चर्चा केली. या वर्षभरात पुतीन यांनी चीनला भाट देण्याचे निमंत्रणही जिनपिंग यांनी दिले आहे. रशिया आणि चीन दोन्ही देशांमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची टीका होते आहे. हे आरोप अमेरिकेकडून होत असून दोन्ही देशांनी आरोप फेटाळले आहेत.