टोकियो – जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याचे पी.व्ही.सिंधू हिचे स्वप्न येथे संपुष्टात आले. स्थानिक खेळाडू अकेनी यामागुचीने तिचा सरळ दोन गेम्समध्ये पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. यामागुचीने जाकार्ता येथे नुकत्याच झालेल्या इंडोनेशियन स्पर्धेतील अंतिम फेरीत सिंधूला सरळ दोन गेम्समध्ये हरविले होते. येथे त्याचीच पुनरावृत्ती करीत तिने 21-18, 21-15 असा विजय मिळविला.
सिंधू व यामागुची यांच्यातील लढतीबाबत कमालीची उत्कंठा होती. जाकार्ता येथील पराभवाची परतफेड करण्याची सिंधूकडून अपेक्षा होती. मात्र येथेयी तिने त्याच अंतिम फेरीतील चुकांची पुनरावृत्ती केली. पहिल्या गेममध्ये तिच्याकडे 12-7 अशी भक्कम आघाडी होती. स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग करीत तिने झकास सुरुवात केली होती. तथापि नंतर तिला परतीच्या फटक्यांवर नियंत्रण मिळविता आले नाही. त्याचा फायदा घेत यामागुचीने 14-14 अशी बरोबरी केली. पाठोपाठ तिने कॉर्नरजवळ प्लेसिंगचा बहारदार खेळ करीत 18-15 अशी आघाडी मिळविली.
ही आघाडी तिने 20-16 अशी वाढविली. सिंधूने सलग दोन गुण घेतले मात्र यामागुचीने एक गुण वसूल करीत ही गेम घेतली. दुसऱ्या गेममध्ये 6-6 अशी बरोबरी असताना सिंधूकडून ही गेम घेण्याची अपेक्षा होती. परंतु पुन्हा तिने केलेल्या अक्षम्य चुकांचा फायदा घेत यामागुचीने 13-7 अशी आघाडी घेतली. सिंधूने ड्रॉपशॉट्सचा उपयोग करीत तिला झुंजविले मात्र तिची आघाडी तोडण्यात तिला यश मिळाले नाही आणि पर्यायाने तिचे या स्पर्धेतील आव्हानही संपले.