जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचा शानदार प्रारंभ

प्रणोयची श्रीकांतवर मात

टोकियो – ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने जपान खुली बॅडमिंटन स्पर्धेत शानदार विजय मिळवित दुसरी फेरी गाठली. पुरुषांच्या गटात भारताच्या एच.एस.प्रणोयने त्याचाच सहकारी व आठवा मानांकित किदम्बी श्रीकांतवर सनसनाटी विजय मिळविला.

जाकार्ता येथे नुकत्याच झालेल्या इंडोनेशियन स्पर्धेत सिंधूला उपविजेतेपद मिळाले होते. येथे त्या पराभवाची कसर ती भरून काढणार काय याचीच उत्कंठा होती. तिने पहिल्या फेरीत चीनच्या हान युई हिचा 21-9, 21-17 असा 37 मिनिटांत पराभव केला. पहिल्या गेमपासून तिने या सामन्यावर नियंत्रण घेतले होते. तिने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्‍यांबरोबरच कॉर्नरजवळ प्लेसिंगचाही सुरेख खेळ केला.

पहिली गेम सहज घेतल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तिच्या खेळात थोडीशी शिथिलता आली. त्याचा फायदा घेत युईने तिला चिवट झुंज दिली. ही गेम घेत बरोबरी साधण्याचे तिचे डावपेच मात्र साध्य झाले नाहीत. सिंधूने पुन्हा आक्रमक खेळ केला व ही गेम घेत सामन्यात विजय मिळविला. सामना संपल्यानंतर सिंधूने सांगितले की, या सामन्यातील माझा खेळ समाधानकारक झाला. तरीही मला अजून पुष्कळ सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे. नेटजवळून प्लेसिंग करण्याच्या शैलीवर योग्य नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

प्रणोय व श्रीकांत यांच्यातील सामना विलक्षण रंगतदार झाला. हा सामना प्रणोयने 13-21, 21-11, 22-20 असा रोमहर्षक लढतीनंतर जिंकला. पहिल्या गेममध्ये श्रीकांतने पहिल्या गेममध्ये खेळावर चांगले नियंत्रण राखले होते. मात्र, दुसऱ्या गेममध्ये त्याला परतीचे फटके व प्लेसिंगवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा घेत प्रणोयने ही गेम घेत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. साहजिकच तिसऱ्या गेमबाबत उत्सुकता वाढली. या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी जिद्दीने खेळ केला.

निर्णायक क्षणी प्रणोयने उत्कृष्ट खेळ करीत ही गेम घेत विजयश्री खेचून आणली. त्याची आता डेन्मार्कच्या रासमुस गेमके याच्याशी सामना होणार आहे. पुरूषांच्या दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रान्किरेड्डी व चिराग शेट्टी यांनी दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. त्यांनी इंग्लंडच्या मार्कोस बेलीस व ख्रिस लॅंग्रीज यांचा 21-16, 21-17 असा पराभव केला.

महिलांच्या दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व एन.सिक्की रेड्डी यांना पहिल्याच फेरीत बाद व्हावे लागले. दक्षिण कोरियाच्या किम सोयांग व कोंग हेई यांग यांनी त्यांच्यावर 21-16, 21-14 असा विजय मिळविला. सिक्की रेड्डी हिला मिश्रदुहेरीतही पराभूत व्हावे लागले. सिक्की रेड्डी व प्रणव जेरी चोप्रा यांना चीनच्या झेंग सेईयेई व हुआंग याक्वियांग यांनी 21-11, 21-14 असे हरविले. हा सामना केवळ 28 मिनिटे चालला.

समीर वर्मा पराभूत

भारताच्या समीर वर्मा याचेही आव्हान संपुष्टात आले. त्याला डेन्मार्कच्या अँडर्स अन्तोन्सन याने 21-17, 21-12 असे पराभूत केले. हा सामना अन्तोन्सन याने 46 मिनिटांमध्ये जिंकला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)