चीनच्या साम्राज्यशाहीला जपानचा ब्रेक

सेन्काकू बेटांबाबतचा चीनचा दावा जपानने फेटाळला

टोकियो – पूर्व चीनी समुद्रात असलेली सेन्काकू बेटे हा चीनचाच भूभाग असल्याचा चीनचा दावा जपानने फेटाळून लावला आहे. ऐतिहासिक काळापासून ही बेटे जपानचा भाग आहेत, असा दावा जपानचे संरक्षण मंत्री किशी नोबुओ यांनी केला आहे. या भागातला चीनी सैन्याचा वाढता हस्तक्षेप आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग आहे, असे जपानने म्हटले आहे. आम्हाला शांतता हवी असली, तरी आमच्या भूभागाचे संरक्षण करण्यास आम्ही समर्थ आहोत, याचा पुनरुच्चार जपानने केला आहे.

पूर्व चीन समुद्रातील सेन्काकू बेटांवरील चीनच्या हालचाली वैध असल्याचे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी म्हटले होते. जपानने या दाव्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. चीनच्या दाव्याला उत्तर देताना चीनचा दावा एकतर्फी आहे. चिनी कोस्ट गार्डच्या हालचालींमुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होते आहे आणि या हालचाली अस्वीकार्य आहेत, असे जपानचे संरक्षण मंत्री म्हणाले. अन्य जपानी मंत्रालयांसह संरक्षण मंत्रालय वादग्रस्त बेटांच्या सभोवतालच्या जागांवर पाळत ठेवण्याचे काम करेल, असेही त्यांनी सांगितले.

जपानच्या सागरी हद्दीत घुसखोरी केल्याचे आढळून आल्यास जपानकडून बळाचा वापर केला जाईल, असा इशारा जपान सरकारने अलिकडेच दिला होता. त्याच्या एक दिवस अगोदर चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी जपानला परिस्थितीमध्ये गुंतागुंत वाढवणारे धोकादायक शब्दप्रयोग आणि कृती थांबवण्याचे आवाहन केले होते. चीनने दावा केलेल्या सागरी सीमेत चीनच्या कोस्ट गार्डच्या बोटींचा संचार बघितला गेला होता. त्यावर जपानने पूर्वीही आक्षेप घेतला आहे.

सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या बोटींवर थेट गोळीबार करण्याची परवानगी देणारा कायदा चीनने मंजूर केला आहे. त्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.