पवारांसोबत भेटीनंतर जानकारांचा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘माझं आणि फडणवीसांचं भांडण पण…’

नेत्यांशी भांडण असले तरी आघाडी सोडणार नाही

बारामती – राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामतीमध्ये केलेल्या आजच्या गौप्यस्फोटाने त्यांचे भाजपमधील नेत्यांशी फारसे चांगले संबंध नसल्याचे दिसून आले.

त्याआधी ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यापासून, ते रालोआ सोडणार की काय, अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र जानकर यांनी रालोआ न सोडण्याची खात्री देत आपण “अन्यत्र’ कुठेही जाणार नसल्याचे सांगितले.

शरद पवार यांच्या भेट घेतल्यापासून जानकर यांच्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. जानकर यांनी आपलं भांडण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत असल्याचं सांगत राजकीय गौप्यस्फोट केला आहे. “माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं भांडण सुरु आहे. पण त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण रालोआमध्येच राहणार आहे, असं जानकर म्हणाले.

महादेव जानकर यांनी म्हटले आहे की, शरद पवार आणि अजित पवार यांना मी भेटलो होतो, हे सत्यच आहे. पण ही भेट गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात होती. मात्र, भाजपावर मी नाराज असलो, तरी मी कुठेही जाणार नाही.

आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं, असं जानकर म्हणाले.

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न सुरुच असल्याचं जानकरांनी सांगितलं. जानकरांना डावलून भाजपानं गोपीचंद पडळकर यांना जवळ केल्यानं जानकर नाराज असल्याचीही चर्चा आहे. त्यावर बोलताना जानकर म्हणाले,माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.