मुंबई -छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील शिवचरित्राचा उत्सव साजरा करण्यासाठी दि. 14 ते दि. 19 मार्च या कालावधीत दादर येथील शिवाजी पार्कवर मराठी महानाट्य “जाणता राजा’चे आयोजन केले आहे, अशी माहिती मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती जल्लोषात साजरे करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि जीवनचरित्र सांगणारे, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले “जाणता राजा’ या महानाट्याची सहा प्रयोगांची मालिका मंगळवार 14 मार्च ते रविवार 19 मार्च या कालावधीत रोज सायंकाळी 6:45 वा. दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित केली आहे.
या महानाट्याच्या विनामूल्य प्रवेशिका मुंबईतील दादर शिवाजी मंदिर, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले, कालिदास नाट्यगृह मुलुंड आणि दामोदर नाट्यगृह परेल आदी ठिकाणी 9 मार्चपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे महानाट्य रोज सुमारे 10 हजार प्रेक्षकांना पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘शिवगर्जने’ला आशीर्वाद यात्रेतून उत्तर
आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)कडून शिवगर्जना यात्रेला सुरुवात झाली आहे. आता भाजपनेही लोकसभेच्या तयारीला सुरुवात केली असून भाजपा-शिवसेना (शिंदे गट) महायुतीकडून रविवारपासून मुंबईतील सहा जिल्ह्यांत आशीर्वाद यात्रा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी माहिती दिली. आशिष शेलार म्हणाले, स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून याच अनुषंगाने भाजप आणि शिवसेना यांच्या वतीने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा रविवारी (ता. 5) मार्चपासून सुरू होत आहे. दीड दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाईल. अशा सहा यात्रा संपन्न होतील.