मुंबई : झपाट्याने पसरत चाललेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्यामुळे आज सगळीकडे कर्फ्यू पाळला जात आहे. या कर्फ्यूच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय करत असतील असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचे उत्तर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांचा फोटो शेअर केला आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जनतेला घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. गर्दी कमी व्हावी म्हणून सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहे. बसमधील गर्दी कमी करण्याबरोबरच आता लोकल सेवाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार आहे.
राजकीय नेत्यांकडूनही लोकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. लोकांनी शक्य होईल तितका सामाजिक जीवनातील वावर कमी करावा, असे नेत्यांकडून सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंब घरी बसून काय करतंय याची माहिती सोशल मीडियातून नागरिकांना दिली आहे. त्याचबरोबर लोकांनी घरी बसून करोनाच्या प्रसाराला आळा घालावा, असे आवाहनही केले आहे.