तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे नगर परिषद, शहर समन्वय समिती, किराणा असोशिएशन आणि भाजीपाला व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 व 25 एप्रिल (शुक्रवार व शनिवार) रोजी सलग दोन दिवसाचा जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) घोषित करण्यात आला आहे.
जनता कर्फ्यूच्या काळात फक्त दवाखाने, औषध दुकान व सकाळी दूध विक्री यांनाच यातून सूट मिळणार आहे. बाकी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाव्दारे जाहीर करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गजन्य आजारामुळे तळेगावात नगरपरिषदेने शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले आहे. यापूर्वी दि 9 व 10 एप्रिल, तसेच 16, 17, 18 एप्रिल दरम्यान जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. तळेगावकरांनी त्याला बंद ठेवून पाठिंबा दिला होता. प्रशासनाने वेळोवेळी घेतलेल्या या भूमिकेने पूर्ण तळेगाव परिसर कोरोना संसर्गमुक्त आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी प्रवीण कानडे, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी आपापल्या पातळीवर चांगले नियोजन केले आहे. तर शहरातील काही समाजसेवी संस्था, सामाजिक संस्था, नगरसेवक व दानशूर व्यक्तीने मोठ्या प्रमाणात यासाठी पुढाकार घेऊन मदत केली आहे.
या जनता कर्फ्यूच्या कालावधीमध्ये नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास प्रभागातील लोकप्रतिनिधी, नगर परिषद कार्यालय – 02114-222449, टोल फ्री क्रमांक – 18002332734 किंवा तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन–02114- 222444 वर संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे