जनता कर्फ्यु…अन् 108 रूग्णवाहिकेची तत्परता

इस्लामपूर : तो मूळचा उत्तर प्रदेशचा..एका खाजगी प्रवाशी बसचा सहचालक… राष्ट्रीय महामार्गावर जनता कर्फ्यु असल्याने वाहने थांबून होती. अचानक त्याच्या पोटात दुखू लागते… सर्व परिसर निर्मनुष्य..काय करायचे प्रश्न पडतो. पेठ नाका येथे काही वाहने उभी होती. त्यातील महाराष्ट्रीयन चालक त्याच्या मदतीला धावतात. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या १०८ नंबर डायल होतो… काही क्षणात रुग्णवाहिका येथे अन् त्याला उपचारासाठी घेऊन जाते….असा प्रसंग आज रविवारी घडला पेठ नाका येथे.

पवन सरोज असे त्या सह चालकाचे नाव आहे. त्याच्या सहकारी खाजगी प्रवासी बस चालकाने जनता कर्फ्यू च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गालगत बस थांबवली होती. तसेच पेठ नाका येथील हॉटेल मनिकंडनच्या आवारात पण चाळीसहून अधिक ट्रक थांबून होते. यात काही खाजगी प्रवासी बस होत्या. जनता कर्फ्यू लागल्याने बस थांबवणे हे चालकांनी पसंत केले होते. थांबलेल्या खाजगी प्रवासी बसमधील सहचालकांच्या अचानक पोटात दुखू लागले होते.  प्रचंड वेदना असह्य झाल्याने तो सैरभैर झाला होता. कुठे जायचे ?  वैद्यकीय मदत कोणाची घ्यायची ? यासाठी तो हतबल होता. वय साधारण पंचवीसीत असणारा तरुण वेदनेने घायाळ झाला होता.

आपत्कालीन परिस्थितीत थांबलेल्या चालकाने अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी असणारा १०८ नंबर डायल केला. वैद्यकीय विभागाला संबंधित  रुग्णाबद्दल माहिती दिली. काही वेळातच उपजिल्हा रुग्णालयाची  रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह पेठ  नाका येथे हजर झाली.

येथे प्रवासी चेक पोस्टवर रुग्णवाहिकेच्या चालकाने चौकशी केली. खाजगी बसचा चालकाची तब्येत ठीक नाही याचे साठी आलो असल्याचे रुग्णवाहिका चालक यांनी सूचित केले. क्षणाचाही विलंब न करता येथे भेट देण्यासाठी आलेले पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी हॉटेलच्या समोर असणारा वाहनतळ दाखवला. तातडीने रुग्णवाहिका तेथे जाऊन पोहचली.

रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  प्राथमिक तपासणी करत त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले. त्याच्यावर उपचार करून सायंकाळी सोडण्यात आले. पवन सरोज उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स वर सहचालक म्हणून काम पाहतो. जनता कर्फ्यूच्या निमित्ताने सकाळी पेठ नाका येथे आल्यावर संबंधित ट्रॅव्हल्स थांबून तो बस मध्ये विश्रांती घेत होता. दरम्यान पोटात दुखू लागल्याने वाहन तळावरील चालकांना त्यांनी त्याची माहिती दिली आणि अत्यावश्यक सेवा अंतर्गत असणारे रुग्णवाहिका संपर्क केल्यानंतर काही क्षणात पेठ नाका येथे पोहोचली. जनता कर्फ्यु दिवशी आरोग्य विभागाने चांगली सेवा सेवा दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.