शेवगाव – शेवगाव तालुक्याला जिल्ह्यात सर्वात कमी पिकविमा फक्त पिक विमा कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे आला. बहुतांश शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहिले म्हणून जनशक्ती विकास आघाडीचे वतीने तहसील कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. संबंधित कंपनीवर पाच दिवसांचे आत शेतकऱ्यांना पिक विमा दिला नाही तर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे लेखी आदेश तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कृषी कार्यालयासमोर जनशक्ती आघाडीच्या वतीने ॲड.विद्याधर काकडे व हर्षदा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनी विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत. उडीद ,सोयाबीन पिकांचा पीकविम्यात समावेश करण्यात यावा. पिकविम्यात आलेल्या गडबडीची त्वरित चौकशी करावी, या मागण्यांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व चौकशी करून तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष प्रशांत सांगडे यांनी ५ दिवसांत शेतकऱ्यांचे खात्यावर पिक विमा वर्ग करावा, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असे लेखी आदेश काढला.
पीक विमा प्रश्नावर गेल्या तीन महिन्यांपासून जनशक्ती विकास आघाडी संघर्ष करीत होते. आमच्या सर्व प्रयत्नांना आता यश आले आहे, असे हर्षदा काकडे म्हणाल्या. तसेच सोयाबीन व उडीद पिके विमा कंपनीने शेवगाव तालुक्यातून वगळली होती. त्या पिकांचा समावेश विमा कंपनीने त्वरित करावा. ही मागणी ही मान्य करून तसा प्रस्ताव जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यासाठी हमी दिली. त्यामुळे आजचा बैठा सत्याग्रह आंदोलन स्थगित करण्यात आला. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.