जामतारातील सायबर लुटारूंवर अमेरिकी संस्था संशोधन करणार

नवी दिल्ली –  देशातील सायबर फसवणुकीसाठी येणाऱ्या दूरध्वनींपैकी बहुतांश दूरध्वनी हे झारखंडमधील जामतारा (Jamtara)  गावातून येत असतात. या गावातील बहुतेक व्यक्ती हेच काम करत असतात. एलआयसीची पॉलिसी, ऑनलाईन खरेदीतील बक्षीस अशी अमिषे दाखवून हे ठग लोकांच्या बँक खात्याचे तपशिल त्याच्याकडून मिळवतात आणि त्याद्वारे त्यांचे बँक खाते साफ करतात. त्यासाठी या लोकांच्या मागे मोठी यंत्रणा काम करत असते.

ऑनलाईन व्यवहारांद्वारे पैसे लुटण्यासाठी विविध मार्गांनी बँक ग्राहकांचे दूरध्वनी क्रमांक मिळवले जातात. त्यासाठी ऑनलाईन विक्री कंपन्या किंवा विमा कंपन्यांमधील अधिकाऱ्यांना हाताशी धरले जाते. अनेकदा ग्राहकाने खरेदी केलेल्या दुकानांमधून किंवा मॉलमधूनही हे ठग ग्राहकांचे दूरध्वनी क्रमांक मिळवतात किंवा विकत घेतात. मग अल्पवयीन शाळकरी मुले लोकांना फोन करून बक्षीस लागल्याचे सांगून बक्षीसाची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी बँक खात्याची माहिती मागतात.

अनेकदा तुम्ही त्यास नकार दिला किंवा तुम्हाला तो सायबर लुटारू आहे याची जाणीव झाल्याने तुम्ही सावधगिरी बाळगून बोलू लागलात की हे ठग अश्लील शिवीगाळ करतात. जामताडातील हे लोक फारसे शिकलेले नसतात तरीदेखील त्यांनी उच्च अधिकारी, निवृत्त अधिकारी आणि सुशिक्षित अशा लाखो लोकांना गंडा घातलेला आहे. अशा या जामतारा गावातील सायबर लुटारूंवर एक वेबसिरीजही बनवण्यात आली होती.

नेटफ्लिक्सवरून ती प्रदर्शित झाली होती. ही मालिका अतिशय गाजली होती. आता जामतारातील या सायबर गुन्हेगारांबाबत अमेरिकेतील संशोधकांना रस निर्माण झाला आहे. या ठगांवर संशोधन करण्याचे ठरवले आहे. अमेरिकेतील तपास संस्था त्यांच्यावर संशोधन करणार आहे. या कमी शिकलेल्या लोकांनी शिकलेल्या लाखो लोकांना आपल्या जाळ्यात कसे ओढले याचा शोध घेण्यात येणार आहे. या लुटारूंना ऑनलाईन व्यवहारांची तांत्रिक माहिती तसेच झटपट व्यवहार करून बँक खाते साफ करण्याची हुशारी त्यांनी कशी प्राप्त केली आहे याबाबत संशोधन करण्यात येणार आहे.

जामतारातली साक्षरतेची टक्केवारी अतिशय कमी आहे. असे असताना या लुटारूंनी तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सुशिक्षित आणि ऑनलाईन व्यवहारांची माहिती असलेल्या लोकांना लाखोंच्या संख्येने कसे काय जाळ्यात ओढले आणि त्याद्वारे कोट्यावधी रुपयांची लूट कशी केली याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सायबर गुन्हेगारीचे केंद्र असल्याने रोज इथे देशातून कुठल्या ना कुठल्या राज्याचे पोलिस तपास करण्यासाठी आलेले असतात. अल्पशिक्षित असूनही या सायबर लुटारुंना माहिती तंत्रज्ञानातील बारकावे कसे माहित असतात आणि ते तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांची बँक खाती कशी हॅक करतात याबाबतचा अभ्यास तेथील लोकांच्या ब्रेन मॅपिंगद्वारे केला जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.