नवी दिल्ली – टाटा परीवाराच्या दानशूरतेबाबत आपण जाणून आहोतच. करोना संकटाच्या काळात देखील रतन टाटा यांनी केलेल्या मदतीबाबत देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. अशातच आता टाटा परिवाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे.
गेल्या १०० वर्षांतील दात्यांच्या यादीत टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना अव्वल स्थान देण्यात आले आहे. एडेल गिव्ह हूरुन तर्फे ही यादी तयार करण्यात आली आहे.
या संस्थेने याबाबत तयार केलेल्या अहवालानुसार जमशेदजी टाटा यांनी प्रामुख्याने आरोया व शिक्षण क्षेत्रासाठी दान केले असून त्याची सध्याच्या घडीला १०२.४ बिलियन डॉलर्स इतकी किंमत होते. जमशेदजी टाटा यांनी १८९२ पासून दिलेल्या मोठ्या देणग्या यामध्ये गृहीत धरण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या यादीमधील अव्वल १० जणांमध्ये जमशेदजी टाटा हे एकमेव भारतीय आहेत. विशेष म्हणजे दातृत्वाच्या बाबतीत टाटा यांनी बिल गेट्स, वॉरेन बफेट यांना देखील पिछाडीवर टाकले आहे. विप्रोचे माजी अध्यक्ष अजीम प्रेमजी यांना या यादीमध्ये १२ वे स्थान देण्यात आले आहे.
एडेल गिव्ह हूरुनने दान केलेल्या मालमत्तेच्या सध्याच्या किंमतीच्या आधारावर ही यादी तयार केली आहे.