दुबई – आयपीएलच्या यंदाच्या मोसमात जम्मू काश्मीरचा नवोदित गोलंदाज उमरान मलिक याने पदार्पण साजरे करताना आपल्या वेगवान गोलंदाजीने सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले आहे. त्याने 153 किलो मीटर प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू यंदाच्या स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे.
या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात झाली तेव्हा उमरान गोलंदाज म्हणून सहभागी झाला होता. त्याला स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल असेही वाटले नव्हते. सनरायझर्स हैदराबादने मलिकचा समावेश नेट गोलंदाज म्हणून केला होता, पण संघातील मुख्य गोलंदाज टी. नटराजनला दुबईत पोहोचल्यानंतर करोनाची बाधा झाल्याने उमरानला बदली गोलंदाज म्हणून संघात घेतले गेले.
केवळ 21 वर्षीय उमरानला सुरुवातीच्या लढतीत अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले नव्हते. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगळुरू यांच्या विरुद्धच्या सामन्यात त्याने ताशी 150 किलोमीटर वेगाने चेंडू टाकले.
त्याने आतापर्यंत या स्पर्धेत जवळपास प्रत्येक षटकात ताशी 145, 141.5, 150, 147, 143, 141 इतक्या वेगाने चेंडू टाकले आहेत. उमरानने पदार्पणातच आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याने कोलकाताविरुद्धच्या लढतीत सलामीवीर शुभमन गिल याला 151.1 इतक्या वेगाने चेंडू टाकला. त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे पदार्पणातच त्याचे नामकरण जम्मू एक्सप्रेस असे झाले आहे.