आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा टीआरपी एकीकडे घसरत असतानाच काही खेळाडूंनी भारतीय संघाच्या निवड समितीला प्रभावित केले आहे. जम्मू काश्मीरचा नवोदित वेगवान गोलंदाज उमरान मलिक हा याच यादीतील एक गुणवान क्रिकेटपटू. अफाट वेगाने चेंडू टाकण्याची ख्याती त्याने यंदाच्या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मिळवली व आता तो जम्मूतावी एक्सप्रेससारखा सुसाट सुटला आहे.
एक भाजीविक्रेता ते आयपीएलमधील न्यू फास्ट सेन्सेशन ठरलेला उमरान खरोखरच भयावह वेगाने चेंडू टाकतो. यंदाच्या मोसमात झालेल्या आयपीएल लिलावात त्याला सनरायझर्स हैदराबादने आपल्याकडे घेतले. उमरानने त्यांचा विश्वास सार्थ ठरवताना आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यात त्याने 9 बळी मिळवले आहेत.
पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या रविवारच्या सामन्यात त्याने त्याने एक चेंडू तब्बल 153 किमी प्रतितास या प्रचंड वेगाने टाकला व आजी-माजी क्रिकेटपटूंसह समालोचकही आश्चर्यचकित झाले. ज्या वेगाने उमरानने हा चेंडू टाकला तो यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. खूप वर्षांपूर्वी भारताच्या वेगवान गोलंदाजीचे समिक्षण करताना पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज व सुलतान ऑफ स्विंग असे ज्याचे सार्थ वर्णन केले जाते तो वसीम अक्रम म्हणाला होता, की तुम्हाला वेगवान गोलंदाज शोधायचे असतील तर उत्तरेत शोधा. त्याचे शब्द खरे ठरल्याचे आपण पाहातच आहोत.
बीसीसीआयच्या निवड समितीने त्याचे संकेत ओळखून हा शोध घेतला व आपल्याला महंमद शमी, महंमद सिराज व आता उमरान असे एकापेक्षा एक सरस वेगवान गोलंदाज मिळाले. उमरान आता केवळ 21 वर्षांचा आहे. त्याच्यासमोरची कारकीर्द व वेळ पाहता तो भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र बनू शकतो.
उमरानचे वडील अब्दुल मलिक जम्मू शहरातील एका चौकात भाजीपाला व फळांचा स्टॉल चालवतात. उमरानही या कामात त्यांना मदत करतो. घरची परिस्थिती बेताची असली तरीही त्यांनी उमरानमधील गुण ओळखले व प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा लावत त्यांनी उमरानच्या क्रिकेटसाठी सढळ हस्ते मदत केली. पंजाबच्या चार विकेट त्याने अवघ्या 28 धावांत घेतल्या.
यात संख्येला महत्त्व नसून त्याच्या वेगासमोर पंजाबची झालेली वाताहत जास्त महत्वाची आहे. उमरानने वयाच्या तीसऱ्या वर्षापासूनच मैदानात क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली पण ती छोटी पाऊले इतका मोठा पल्ला गाठतील असे त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांनाही माहिती नव्हते.
एक दिवस हाच उमरान भारतीय संघाकडूनही खेळताना दिसला तर त्याच्या पालकांनी केलेल्या कष्टाचे चीज होइल यात शंका नाही. तसेच येत्या काळात उमरानकडून प्रेरणा घेत नवनवे वेगवान गोलंदाजही पुढे येतील असाविश्वास वाटतो.