जम्मू काश्‍मीरला राज्याचा दर्जा पुन्हा प्राप्त व्हावा – चिदंबरम

नवी दिल्ली – केंद्र सरकारने संसदेत कायदा संमत करून जम्मू काश्‍मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केले आहे. ती घोषणा रद्द करून त्या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केली आहे.

काश्‍मीर प्रश्‍नावर राजकीय तोडगा काढण्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे असेही त्यांनी म्हटले आहे. जी बाब घटनेत नमूद करण्यात आली आहे, त्यात केवळ संसदेत कायदा करून बदल करता येणार नाही, घटनेतील तरतुदीचा गैरअर्थ लावला गेला असून या तरतूदींचा गैरवापरही केला गेला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी येत्या 24 जूनला चौदा पक्षांची सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे त्या पार्श्‍वभूमीवर चिदंबरम यांनी ही सुचना केली आहे. जम्मू काश्‍मीर हा केवळ भारतासाठी जमीनीचा एक तुकडा नाही तर तेथील लोकांच्या भावना जपण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे सरकारने संसदेच्या पावसाळी सत्रात त्या राज्याला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. जम्मू काश्‍मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देणे ही कॉंग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.