जम्मू-काश्‍मीरचे जनजीवन वेगाने पूर्वपदावर

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर : दोडाचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांची माहिती


वाहतूक व्यवस्थाही हळूहळू होतेय पूर्ववत

पुणे – जम्मू-काश्‍मीरमधील जनजीवन वेगाने पूर्वपदावर येत असून याठिकाणी विकासात्मक कामासाठी मोठ्या योजनांची अंमलबजावणी जोमाने सुरू आहे. काश्‍मीरचा देशाशी व्यापार जवळ-जवळ पूर्ववत झाला असून त्यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे जम्मूतील दोडा येथील जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांनी सांगितले.

काश्‍मीरमधील परिस्थितीबाबत पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते म्हणाले, काश्‍मीरमधील परिस्थिती सुरळीत असून तिथे प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय त्याचा इतरांना अंदाज येऊ शकणार नाही. काश्‍मीरचा वेगात विकास करण्यासाठी डोडा जिल्ह्यात नेमके काय केले जात आहे, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, शिक्षणाचा दर्जा सुधारल्यानंतर शिक्षित व्यक्‍तींच्या हातून विकासात्मक कामे वेगात होतात. ही बाब लक्षात घेऊन या जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. डोडा जिल्ह्यात “जिम्मेदारी’ नावाचा उपक्रम सुरू करण्यात येत असून त्यांतर्गत शाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. या शाळांसाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून या शाळांतील शिक्षणाच्या दर्जाला मानांकन दिले जाते. त्या आधारावर नंतर या शाळांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना स्पर्धा परीक्षांत यशस्वी करता यावे याकरिता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याआधी या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था अंमलात नव्हती. आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक उत्तरदायीत्वाने व्हावे, याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी झालेल्या निवडणुकांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करून ग्रामपंचायत पातळीपर्यंत लोकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे. या संस्थांच्या माध्यमातून जी कामे केली जातात त्यातून रोजगार निर्मिती कशी वाढेल याकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील अनेक विद्यापीठांनी काश्‍मीरमध्ये काम करण्याचा मनोदय व्यक्‍त केला आहे. त्या आधारावर आगामी काळात या विद्यापीठांना परवानगी देण्याबाबत कामकाज सुरू आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश आहे.

युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न
शिक्षणाच्या आणि अर्थार्जनाच्या अभावामुळे काश्‍मीरमधील युवक काही प्रमाणात हिंसाचारात भाग घेत होता. आता या युवकांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याकरिता शिक्षणाची व्यवस्था वाढवणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे याला प्राधान्य दिले जात आहे. त्याचबरोबर हे शिक्षण रोजगार निर्माण करणारे असेल याची दक्षता घेण्यात येणार आहे. काश्‍मीर युवकांच्या हाताला काम मिळाल्यानंतर हे युवक मुख्य प्रवाहात वेगाने सहभागी होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.

रस्ते आणि रेल्वेचे विस्तारीकरण
जम्मू-काश्‍मीर हा डोंगराळ भाग आहे. त्याठिकाणी शेती आणि पर्यटन व्यवसाय आहेत. हा भाग देशाशी जोडला गेल्यानंतर त्यातून गुंतवणूक आणि तंत्रज्ञान काश्‍मीरमध्ये येऊ शकणार आहे. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी रस्ते आणि रेल्वेचे विस्तारीकरण करण्याचे मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. वर्षभरात यातील बरेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा भू-प्रदेश भारताशी अधिक चांगल्या प्रकारे जोडला जाणार आहे.

पर्यावरणपूरक उद्योगांना चालना
काश्‍मीर निसर्गसौंदर्याने नटलेला भू-प्रदेश आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटन उद्योगाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. मात्र, आतापर्यंत तेथील पर्यटन उद्योग हा बऱ्याच प्रमाणात औपचारिक पातळीवर चाललेला होता. आता इतर राज्यांतून या ठिकाणी गुंतवणूक येणार असल्यामुळे हा उद्योग अधिक औपचारिक चौकटीत वाढण्याची शक्‍यता आहे. यासाठी आवश्‍यक त्या परवानग्या लवकर देण्याचा काश्‍मीर सरकारचा प्रयत्न आहे. अशाचप्रकारे पर्यावरणाची फार हानी होणार नाही, अशा प्रकारचे सेवा उद्योग या ठिकाणी आगामी काळात वाढणार आहेत. काश्‍मीरमधील जैववैविध्याला तडा जाऊ नये, याची काळजी घेण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.